नवी मुंबई पोलिसांचे नशा मुक्ती अभियान’ महाराष्ट्राचे ‘रोल मॉडेल ठरणार

मुंबई -( दि २१) संतोष पडवळ

साहित्यिक, सामाजिक प्रगल्भ जाणीव आणि शरीरातील धमन्यांतून वाहणारी क्रियाशीलता ही त्रिसुत्री ज्यांच्या ठायी ठासून भरलेली आहे, ते मिस्टर ब्रिलियंट, नवी मुंबईचे अपर पोलिस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील सामाजिक भान ठेवून नवी मुंबईत नव्या दमाने, वेगळ्या धाटणीने ‘नशा मुक्ती अभियाना’ची बीजे पेरण्यात गुंतले आहेत. त्यांची संकल्पना आणि त्यामागील प्रत्यक्ष मेहनत महाराष्ट्रात ‘रोल मॉडेल’ ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे आणि आयुक्त बिपिनकुमार सिंह यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यासाठी त्यांनी मुहूर्तमेढ रोवली आहे.
मुळात साहित्यिकाचा पिंड असलेले डॉ. शेखर पाटील हे तल्लख बुद्धीचे आहेत. पोलिस दलातील मर्यादा, चौकटीला सन्मानाचे गोंदण देत माणसातील उणीवा शोधून त्याचे पुनर्वसन करण्याचे इंद्रधनु ते पेलत आहेत. हे करीत असताना आतापर्यंतच्या नोकरीतून त्यांची कीर्ती आणि पोलिस दलाचा सन्मान काकणभर वाढला आहे. त्याच आत्मविश्वासातून ते नवी मुंबईत पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या सहकार्याने नशा मुक्तीचे सर्व समावेशक अभियान राबविण्यासाठी मास्टर प्लान तयार करीत आहेत. ते मॉडेल महाराष्ट्र पोलिस दलाला नवी दिशा देईल, अशा रितीने त्यांनी बांधणीला सुरुवात केली आहे.
बेसिकली सरकारी अध्यादेश, ती चौकट, अगदी सोपस्कारापुरती अशी अभियानं प्रत्येक कार्यालयातून राबवून वरिष्ठांवर छाप पाडण्याचा एक कलमी कार्यक्रम कमी अधिक प्रमाणात सगळीकडे होतो. डॉ. शेखर पाटील यांच्या रक्तात हा दिखाऊपणा अजिबात जाणवत नाही. महाराष्ट्राच्या मातीत जी रग आहे समाजाप्रती, ती त्यांच्यात ठासून भरलेली आहे. त्यातून त्यांनी हा नव्याने इथे यज्ञ प्रज्वलित करून भरकटलेल्या तरुणाईला स्वच्छंद समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी प्लान ‘ए’, प्लान ‘बी’ तयार केला आहे. उत्तम मांडणी, नियोजन आणि विशेषतः सर्व समावेशकता ही त्यांच्या अभियानाची मुख्य ताकद राहील, असे त्यांच्या नियोजनातून दिसते.
अतिशय व्यस्त जीवनशैली असलेल्या मिस्टर ब्रिलियंट यांच्याशी या अभियानाच्या निमित्ताने भेट ठरली. त्यांच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना जाणून घेताना, आभाळ कवेत घेण्याचे सामर्थ्य असलेला समर्थ अधिकारी, मृदु भाषा, करारी नजर, दणकट शरीरयष्टी आणि उंचपुरे व्यक्तिमत्व अनुभवताना तब्बल चार तासाच्या संवादातून त्यांच्या वेगळ्या भावविश्वासाचा नाद कानात गुंजत होता. अशी माणसं परमेश्वराने फुरसतीत तयार केलेली असतात. अगदी पृथ्वीला पडलेले ते दिव्यस्वप्नं वाटावं इतके तेजोमय.
अंमली पदार्थ, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाचा विलक्षण विळखा नवी मुंबई परिसराला पडला आहे. खारघर, तळोजा, पनवेल, कळंबोली आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे, उलवे नोड, बेलापूर-सीबीडी, वाशी आदी शहरात अंमली पदार्थांचा राक्षस तरुणाईभोवती वेटोळे घालून आहे. त्या विळख्यातून नवी मुंबईला सुरक्षित बाहेर काढून शाप मुक्त करण्यासाठी डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी टास्क फोर्स निर्माण केले आहे. सर्जिकल स्ट्राईक करण्याची त्यांची वेगळी आणि तितकीच गोपनीय संकल्पना त्यांनी तयार केली आहे. त्याचा प्रारंभ करून अगदी अल्पावधीत ते यश प्राप्ती करण्यासाठी त्यांनी आतापर्यंतचा अनुभव पणाला लावण्याचे ठरविले आहे.
अंमली पदार्थ, त्यातील अर्थकारण, गुन्हेगारीचे नवी मुंबईतून उच्चाटन करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. त्यांच्या संकल्पनेचा प्रत्यय नवी मुंबईसह महाराष्ट्राला अनुभवायला मिळेल, त्याबाबत आताच अधिक वाच्यता करायला नको. त्याकरिता जनजागृती, ठोस कारवाई आणि समाजातील संवेदनशील माणसांचा समूह त्यांनी वेगळ्या उंचीवर तयार केला आहे.
ही संकल्पना त्यांच्या यशाचे गमक ठरेल आणि नवी मुंबई पोलिस दलाचे ‘नशा मुक्ती अभियान’ महाराष्ट्राला ‘रोल मॉडेल’ ठरेल, याचा विश्वास त्यांच्या विचारातून डोकावत आहे.

पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह
अभियानाचे ऊर्जादायी स्त्रोत !
………………………………..

डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या अजोड कर्तुत्वातून नवी मुंबईत साकारणाऱ्या नशा मुक्ती अभियानाला पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांचे प्रमुख मार्गदर्शन व सहकार्य त्यांना लाभणार आहे ते या अभियानाचे खरे ऊर्जास्त्रोत असतील. त्यामुळे अभियानाला चार चाँद लागतील.

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close