शहापूर तालुक्यात तीन जिवलग मित्रांनी केली सामूहिक आत्महत्या : मोक्ष प्राप्तीसाठी आतमहत्या केल्याची चर्चा
ठाणे -( दि २१) संतोष पडवळ

जिवलग मित्रांच्या आत्महत्या ही तिघांनी ‘मोक्ष’ मिळवण्यासाठी केली असल्याची चर्चा शहापूरमध्ये सुरू आहे. या तिघांनी अमावश्याच्या दिवशीच एकाच साडीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांना याबाबत कुठलेही ठोस पुरावे अद्याप मिळून आलेले नसून याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे शहापूर तालुका विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले
शहापूरमधील चांदा गावात राहणारे नितीन बेहरे (३०), मुकेश घावटे (२८) आणि महेंद्र दुबले (३१) या तीन जिवलग मित्रांनी गावाच्या बाहेर असणाऱ्या एका झाडाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. या तिघांच्या आत्महत्येने शहापूर तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. शहापूर पोलिसांना या तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते. घटनास्थळी दोन देशी दारूच्या बॉटल आणि तिघांच्या खिशात मोबाईल फोन मिळून आले होते. हे तिघे मित्र १४ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाले होते. अखेर १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी शहापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
नितीन बेहरे हा तांत्रिक विद्याच्या आहारी गेला होता. रात्री बेरात्री हे तिघे स्मशानात जावून काहीतरी विधी करीत असल्याचे अनेकांनी त्यांना बघितले होते, अशी चर्चा चांदा गावात सुरू आहे. परंतु पोलिसांना याबाबत कुठलेही ठोस पुरावे अद्याप मिळून आलेले नाहीत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.