ग्राहकांनी आयोगाकडे तक्रार करण्यासाठी इ – दाखील या कार्यप्रणालीचा वापर करून घरबसल्या न्याय मिळवावा: अॅड.तुषार झेंडे पाटील

बेल्हे ( दि १४) प्रतिनिधी
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय जुन्नर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर जि.पुणे यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण सप्ताह समारोप समारंभ नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे पार पडला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अभ्यास मंडळ प्रांत प्रमुख अॅडव्होकेट
तुषार झेंडे पाटील व अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आले.
ग्राहकांनी तक्रार दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त इ – दाखील या कार्यप्रणालीचा वापर करून घरबसल्या न्याय मिळवावा.एक ग्राहक म्हणुन सर्व प्रकारच्या मार्गदर्शनासाठी माहितीसाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन १९१५ चा वापर करावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अभ्यास मंडळ प्रांत प्रमुख तुषार झेंडे पाटील यांनी केले
यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,ग्राहक पंचायत जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे,संघटक कौसल्या फापाळे,बावासाहेब भोसले,नंदाराम भोर,संतोष नेहरकर,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटिल,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.विपुल नवले,प्रा.सचिन भालेकर, प्रा.गांधी सर्व विभागप्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅडव्होकेट तुषार झेंडे पाटील उपस्थितांशी चर्चात्मक संवाद साधत म्हणाले की,ग्राहक घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून तक्रार दाखल करून ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल करू शकतात.ग्राहक त्यांच्या तक्रारीची सुनावणी देखील ऑनलाईन माध्यमातुन घरी बसून मोबाईलद्वारे करता येते.तसेच निकाल देखील ई-मेलच्या माध्यमातून घरबसल्या मिळू शकतात.दिलेलं वचन न पाळल्यास कंपनीवर देखील कारवाई होऊ शकते.जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच,पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता.यावेळी नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बाबत अॅडव्होकेट झेंडे यांनी सविस्तरपणे विश्लेषणात्मक माहिती दिली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अध्यक्ष बाळासाहेब औटी म्हणाले कि ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने ग्राहकांचे हक्क,जबाबदाऱ्या व कर्तव्ये समजावून घेतली पाहिजेत.२४ डिसेंबर हा दिवस ग्राहक दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा मुलाधार असून या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी,ग्राहक,व्यापारी,उद्योजक आणि श्रमिक हे पंचप्राण आहेत.या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत.
एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या याची विस्तृत माहिती देत त्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सुरक्षेचा हक्क,माहितीचा हक्क,निवड करण्याचा हक्क,तुमचे म्हणणे मांडण्याचा हक्क,तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क तसेच ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार याविषयी उदाहरणासहित माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी,प्रास्ताविक अॅडव्होकेट विठ्ठल मुळे यांनी तर आभार डॉ.अनिल पाटिल यांनी मानले.