तहसीलदारांनी साधला अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांशी मुक्त-संवाद : मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहीमेला उदंड प्रतिसाद

बेल्हे -( दि २८) प्रतिनिधी
मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहिमे अंतर्गत प्रचार आणि प्रसार होण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे (बांगरवाडी) येथे ऑनलाईन ऍप द्वारे मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून जुन्नर चे तहसीलदार रविंद्र सबनीस उपस्थित होते.
यावेळी समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,समर्थ बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,रा से यो अधिकारी प्रा.विपुल नवले,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर,प्रा.अमोल काळे,प्रा.दिनेश जाधव,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे तसेच मंडल अधिकारी संजय गायकवाड,बेल्हे गावचे तलाठी बढे भाऊसाहेब,लोंढे भाऊसाहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधत तहसीलदार रविंद्र सबनीस म्हणाले की घटनेने १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार दिलेला आहे.राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान मोलाचे आहे.युवकांनी मतदान प्रकियेत सहभागी होऊन लोकशाही समृद्ध व बळकट करावी.मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे.घटनेने दिलेला अधिकार हक्क कर्तव्याचे पालन करावे.यंत्रणेवर टीका करण्यापेक्षा मतदान करून सक्षम लोकप्रतिनिधी निवडून देऊन व्यवस्था बळकट करावी.आधार लिंकिंग चे फायदे काय आहेत याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.लोकशाहीचे चार स्तंभ तसेच महसूल विभाग,ग्रामविकास विभाग,वन,गृह,जलसंपदा,ऊर्जा आदि विविध विभागातील कामकाजा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र सांगताना रविंद्र सबनीस म्हणाले कि,जिज्ञासा आणि कुतूहल हेच शिकण्याचे खरे तंत्र आहे.विद्यार्थ्यांनी सतत नाविन्याचा ध्यास ठेवला पाहिजे.नवनवीन ज्ञान आत्मसात करून विचारमंथन केले पाहिजे.
एम पी एस सी परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबाबत रविंद्र सबनीस म्हणाले कि,उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग,साधन सामुग्री आणि अभ्यासक्रमाचे अवलोकन व मंथन या महत्वाच्या गोष्टी आहेत.यावेळी नायब तहसीलदार ते तहसीलदार पर्यंतचा जीवनप्रवास त्यांनी विद्यार्थ्यांपुढे विशद केला.तसेच शासकीय कामकाज पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी जुन्नर तहसील कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विपुल नवले यांनी प्रास्ताविक प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी मानले.