पिंपळवंडी येथील दोन लहान मुलांमुळे वाचले ग्रे हेरॉनचे(राखी बगळ्याचे) प्राण
पिंपळवंडी,ता.४: पिंपळवंडी(ता.जुन्नर) येथील सम्यक भरत कसबे(वय१२) व चिरायु भरत कसबे(वय११) या दोन भावांमुळे एका राखी बगळ्याचे प्राण वाचले.
सम्यक व चिरायु या दोघांना रविवारी(ता.३) संध्याकाळी त्यांच्या घराजवळच असलेल्या शाळेच्या मैदानावर एक मोठा पक्षी जखमी अवस्थेत दिसुन आला. त्याच्या मागे दोन कुत्री लागल्याचे त्यांनी पाहिले. दोघांनी त्या कुत्र्यांना हाकलले व सदर पक्षाची माहिती वडील भरत कसबे यांना दिली. त्वरित भरत कसबे व विजय जाधव यांनी घटनास्थळी येऊन त्या पक्षाला अलगद उचलुन आपल्या घरी आणले सिद्धार्थ कसबे यांनी वनविभागाला याची माहिती कळवली. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके,वनकर्मचारी भाऊसाहेब साळुंखे ,दीपक माळी हे घटनास्थळी दाखल झाले व त्या पक्षाला उपचारासाठी घेऊन गेले.
घोडके यांनी सम्यक व चिरायुचे अभिनंदन करून सांगितले कि सर्वांनी पर्यावरणाप्रती सजग राहुन कोणताही जखमी प्राणी आढळल्यास वनविभागास कळवावे.
सदर पक्षाच्या पंखाला इजा झाली असल्याने तो उडु शकत नाही त्याच्यावर उपचार करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार असल्याचेहि ते म्हणाले.
राखी बगळा हा भारतात सर्वत्र आढळणारा पक्षी असुन त्याचे मुख्य खाद्य हे मासे आहेत अशी माहिती पक्षीमित्र आकाश डोळस यांनी दिली.