क्लस्टर योजनेत दिव्यातील एन.आर.नगर, क्रीश कॉलोनी, नागवाडी, गावदेवी मंदिर परिसराचा समावेश करा- आमदार निरंजन डावखरे यांची आयुक्तांकडे मागणी
ठाणे, ता १८, (संतोष पडवळ(विभागीय संपादक)

ठाणे महानगर पालिकेतर्फे ठाणे पालिका कार्यक्षेत्रात ४४ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून त्याचे वेगवेगळे पुनरुत्थान आराखडे(URP) तयार करण्यात आले आहेत. परंतु दिवा पश्चिमेतील काही विभाग मात्र या मध्ये समाविष्ट केले नाही. या विभागांचा देखील कलस्टर योजनेत समाविष्ट करावे या मागणी साठी आज भाजपा ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिव्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्तांची भेट घेतली.
ठाणे शहरातील काही विभागांचा तातडीचे म्हणून काही ठिकाणांचा पायलेट प्रोजेक्ट म्हणून त्या विभागांना मंजुरी देऊन कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. सदर क्लस्टर योजनेत अनधिकृत, धोकादायक, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हे सर्व हटवून त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्र घरे बांधून त्यांचे तिथेच पुनर्वसन केले जाणार आहे. सदर योजनेत चार FSI देण्यात येणार असल्यामुळे खूप मोकळी जागा उपल्बध होणार असून उद्याने, आरोग्य केंद्र, पार्किंग, सरकारी कार्यालये, समाज विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच रस्ते मोठे होतील व नाल्यांची पुनर्बांधणी होणार आहे. एकंदरीत नियोजनबद्ध विकास होऊन वस्तीत व अनधिकृत इमारतीत राहणाऱ्यांना चांगले घर व दिलासा मिळणार आहे.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात मंजूर क्लस्टर योजनेत दिवा विभागाचा समावेश असून दिवा पूर्व भागातील URP ४१, URP ४२, URL ४३ या पुनरुत्थान अरखाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
दिवा विभागात अनधिकृत इमारतींचा प्रश्न मोठा असून त्यामुळे उपलब्ध सुखसुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. दिवा विभागातील धोकादायक इमारतींची यादी देखील मोठी आहे.
क्लस्टर योजनेत दिवा पूर्व भागाचा समावेश जरी केला असला तरी दिवा पश्चिम भागाला समाविष्ट करण्यात आले नाही. दिवा पश्चिम भागातील एन. आर.नगर, क्रीश कॉलोनी, नागवाडी, गावदेवी मंदिर परिसर या भागात देखील मोठी वस्ती असून अनधिकृत आणि जुन्या इमारतींची संख्या देखील खूप आहे. दिवा स्टेशन परिसरातच हा विभाग असल्याने येथे सुनियोजित विकास होणे गरजेचे आहे.
ठाणे महानगर पालिकेने जेव्हा संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रातील विभागांचा समावेश केला तेव्हाच दिवा पश्चिम विभागाचा देखील समावेश होणे गरजेचे होते परंतु दुर्दैवाने नेहमी प्रमाणे या विभागाला डावलण्यात आले.
त्यामुळे दिवा पश्चिम विभागातील *एन. आर.नगर, क्रीश कॉलोनी, नागवाडी व गावदेवी मंदिर परिसरचा क्लस्टर योजनेत समावेश करावा,* अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी आयुक्तांकडे केली यावेळी भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष अँड आदेश भगत, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष निलेश पाटील, शहर कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे, विजय भोईर, दिवा सरचिटणीस समीर चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत आदी उपस्थित होते.